प्रिय वाचकहो,
लिखाणातील शब्द तेच राहिले तरी अभिव्यक्तीची माध्यमं बदलतात. भूर्जपत्रावरची अक्षर अलगद कागदावर उतरली तिथून ती छापील झाली, कधी स्वरबद्ध झाली, कधी ध्वनीच्या माध्यमातून आली तर कधी दृश्य माध्यमातून थेट तुमच्या हातातल्या छोट्या मोबाईल मध्ये अवतरली.
गेली जवळजवळ चाळीस वर्ष मी लिहितेय. आणि माझे सहृदयी वाचक माझे सुहृद झालेत. त्या बद्दलची कृतज्ञता तर आहेच पण इथे विषय वेगळा आहे. डिजिटल माध्यम हे प्रभावी, त्वरित पोचता येईल असं माध्यम आहे.
खलील जिब्रान एके ठिकाणी म्हणतो,
आता समोर दिसतो आहे अनंत असा व्यापक समुद्र,
आहे ज्यात तिला प्रवेश करायचा आहे.
परतणं तर अशक्य आहे.
प्रवेश हा मोठा विषय नाही,
पण स्वतः समुद्र होऊन जाणं हे साध्य आहे.
अशा डिजिटल जगात मी प्रवेश करते आहे. तुम्ही आधीही बरोबर होताच, म्हणून तर कविता क्षीरसागरांच्या कवितेसारखी
एक नाजूक पक्षी
किती सहज उडतोय
आभाळ पाठीवर घेतोय..
अशा उन्मन अवस्थेत छापील शब्दांबरोबर मी आता पर्यंत होते, पण आता या नवीन माध्यमाच्या संगतीनं तुमच्या पर्यंत येतेय. सात्यत्यानं तुमच्यापर्यंत पोहोचत राहण्याचा प्रयत्न राहिलाच. तुमची साथ अपेक्षित आहे. मिळेल अशी खात्री आहे. माझी सध्य:स्थिती –
टेकवूनी माथा
प्रेम आदराने
मागणे तरीही संपेचना
अशी असली तरी हक्काच्या जागी माथा टेकवते याची जाणीव खोलवर आहेच.
- डॉ. छाया महाजन (www.chhayamahajan.com)
स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा छायाताई
अभिनंदन छाया. मन:पूर्वक शुभेच्छा .