अभिप्राय: स्पर्श

आपले लेखन खरोखरीच आवडले. कथेच्या आपल्या भाषेची जाण अभिनंदनीय वाटली. आपल्या भाषेला सखोलतेची चांगली देण लाभली आहे. ही भाषा सूक्ष्म संवेदना व स्पंदने नेमक पकडते. – आनंद अंतरकर, पुणे

पुस्तक पहिले वहिले असले तरी लेखिका उदयोन्मुख आहे असे म्हणता येणार नाही. इतके छायाबाईंचे लेखन कसदार आहे. त्यांनी लघुकथेपेक्षा प्रदिर्घकथा किंवा कादंबरी लिहावी. अशी ताकद त्यांच्या सहज प्रतिभेत आहे हे जाणवले. लेखिकेची लेखणी तशी समर्थ आहे. – अनंतराव कुलकर्णी, प्रकाशक, काँटीनेंटल, पुणे

‘स्पर्श’ हा छाया महाजन यांचा कथासंग्रह वाचतांना मला सर्वात आधी प्रत्यय आला तो लेखिकेच्या साहित्यिक प्रगल्भतेचा. अनेक लेखक किंवा लेखिकांचे अनेक संग्रह प्रसिद्ध झाल्यानंतरही जी साहित्यिक प्रगल्भता जाणवत नाही ती यांच्या संग्रहात जाणवते. मला त्यांची कथा सांगण्याची पद्धत नवीन वाटली. वाचायला सुरवात केल्यावर दोन चार वाक्यात जाणवलं निवेदनाची ही ढब नवीन आहे. थेट, सरळ, सोपी थेट विषयाला भिडणारी, वाचकाला सरळ कथा प्रवाहात ओढून घेणारी, संग्रहातील पुष्कळ कथा पुरुष पात्रांच्या कथा आहेत आणि कथन प्रथम पुरुषी आहे. पुरुषांची मानसिकता आणि पुरुषी भाषाढंग छायाजींनी आतून समजावून घेतली आहे. – ह. मो. मराठे, १९८७

प्रा. सौ.महाजन यांनी आपल्या कथांतून वेगवेगळे विषय हाताळले आहेत. त्यांच्या साहित्यात उत्कृष्ठ साहित्याची बीजे असलेली आढळतात. — डॉ. आनंद यादव ७ मार्च १९८६, दै.मराठवाडा, औरंगाबाद

लेखिकेने अगदी सहजपणे कथा लिहिल्याचे जाणवते. जीवनाचा गांभीर्याने केलेला विचार त्यातून जाणवतो. त्यांच्या लेखनात कथेच्या ’फॉर्म’संबंधीची स्पष्ठता दिसते. आणि त्यात न अडकण्याचा सावधपणाही आढळतो. — डॉ. नागनाथ कोतापल्ले, ७ मार्च १९८६, दै.मराठवाडा.

प्रभावी अशा प्रकारचे साहित्य आपण वाचत आहोत अशी जाणीव हे पुस्तक वाचताना निर्माण होते. यातील कथा लहान आहेत पण परिपुर्ण आहेत. माणसाच्या मनातील सूक्ष्म भावनात्मक संघर्ष टिपण्याचे प्रयत्न यात झालेले आहेत. हा एक सकस कथासंग्रह आहे. — डॉ. भगवंतराव देशमुख, ७ मार्च १९८६, दै. मराठवाडा, औरंगाबाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *