नकळत मधील कथा ह्रदयस्पर्शी आहेत. या कथांमध्ये स्त्रीपुरुष संबंधाचे चित्रण करण्यात आलेले आहेत. मानवी मनाच्या गुंतागुंतीचा मागोवा घेण्याची प्रवृत्ती यात दिसून येते. अनंत काणेकर, जी ए कुलकर्णी यांच्यानंतर लघुत्तम कथेची धुरा वाहण्याचे सामर्थ्य छाया महाजन यांच्या लिखाणातून दिसते. – शांताबाई शेळके.
लघुतमकथा प्रतिकात्मक कथा म्हणून ओळखली जाते. ही कथा टीकाकारांना नेहमीच चकविते. काव्य आणि गद्याच्या सीमेवरचा हा प्रकार आहे. छाया महाजन यांनी सहजतेने आणि समर्थपणे हा कथा प्रकार हाताळून आपले अनुभवविश्व वाचकांसमोर मोजक्या शब्दात परिणामकरित्या उभे केले आहे. – सुधीर रसाळ (विमोचन प्रसंगी) १९ फेब्रुवारी १९९२
या कथा संग्रहात सत्य-शिव आणि सौंदर्याचा शोध घेतला आहे. – अनंतराव कुलकर्णी काँन्टीनेंटल प्रकाशन, पुणे (विमोचन प्रसंगी)
त्यांच्या कथा प्रायोगिक स्वरुपाच्या असून जीवनातल्या एरवी निसटून जाणार्या अनुभवांची मांडणी त्या अत्यंत थोडक्या शब्दात करतात. जगतांना दृष्ठी असेल तर प्रत्येकच क्षणात काही भावगर्भ शोधता येतो याचं प्रत्यंतर त्यांच्या अल्पाक्षरी कथातून येतं. त्यांचं कथाविश्व मानवी संबंधांचं भावस्पर्शी चित्रण करतं. व्यक्तीमनाच्या गाभ्याचा अचूक शोध घेणारी संवेदनशीलता त्यांना लाभलेली आहे. स्वाभाविकपणानं काव्यमय होणारी शैली नेमक्या शब्दात सघन अर्थ भरण्याची हातोटी आणि भावसंबंधांचं तरल चित्रण अशी त्यांच्या कथांची काही वैशिष्ठे सांगता येतील. कुठल्याही विचारसरणीच्या कुबड्या न घेता स्त्री मनाच्या नाजूक भावनांचे उत्कट शब्दांकन त्यांची कथा साधते. – रविंद्र किंबहुने, समीक्षक, रेडीओ, औरंगाबाद
लघुनिबंधापेक्षा लघुतम कथा जास्त भावल्या. अर्थात नीतळता, स्वच्छ व लेखनदृष्ठी मला मोलाची वाटली. गावच्या मातीपासून इंग्रजी डॉक्टरेट तुटलेली नाही हे लेखनातून जाणवते. हा स्पर्श मातीचा असल्याने लेखनात टवटवीतपणा आहे. – डॉ. आनंद पाटील, गोवा, १०/१०/१९९६
लेखिकेमध्ये एक तरल प्रतिभा आहे. आणि त्या प्रतिभेला मनोहर शब्दरूप देण्याचे सामर्थ्य तिच्यात आहे. नकळत कथासंग्रहातील प्रत्येक कथा हे आधुनिक जीवनावरील व्यथित करणारे भाष्य आहे. लेखिकेचे व्यक्तिमत्व प्रस्थापित सामाजिक मूल्यांनी घडलेले. ही मुल्य उध्वस्त होताहेत, नव्या मूल्यांची प्रतिष्ठापना दृष्ठीपथास येत नाही अशा धुसर संध्याकाळी लेखिकेने जे अनुभवले. त्यातील आशयाचा शोध घेत ती लिहीत आहे. — श्री नारायणराव लोहारकर, सोलापूर दि.१०/४/१९९४ (ज्येष्ठ स्वातंयसैनिक व साहित्याचे अभ्यासक)
लघुतमकथा हा आकृतीबंध बराच कालावधीनंतर मराठीत लिहीला जातोय तोही अतिशय समर्पकतेने. छोट्या छोट्या कथाव्दारे व्यक्त झालेल्या आशयाचे सम्यक दर्शन होणे हाच वाचकाचा आनंद. छाया महाजन यांची शैली स्वदर्शनातून आलेल्या अनुभवांना वेगळा घाट देणारी आहे. — अरुण कुलकर्णी (लेखक)
खरे तर छाया महाजन यांनी मांडलेली समाज जीवनाची एक एक बाजू म्हणजे एक एक सामाजिक प्रश्नच आहे; पण तो व्यक्त होतांना आक्रस्ताळेपणा नाही. तीव्र उपहासातून किंवा सहजतेतूनच या कथा दाहक सत्य प्रखरतेने दर्शवितात. — प्रा चंद्रज्योती भंडारी समीक्षक, दै.लोकपत्र, नांदेड १मार्च १९९२
लघुतमकथा ह्या जपानी हायकु सारखा प्रकार वाटतो. थोड्या शब्दात जास्त अर्थ दाखविणारा हा प्रकार आहे. जीवनातील सर्व संदर्भ या कथांमधून चित्रित करण्यात आले आहेत. सरळ सोपी भाषा व चित्रमय प्रदर्शनामुळे अर्थपूर्ण असे हे पुस्तक तयार झाले आहे. — प्रा. बळवंत बडवे, दै. सत्यप्रभा, नांदेड २५ मार्च १९९२
छायाताई —— २/३ दिवस जरा गडबडीत होतो त्यामुळे अभिप्राय देण्यासाठी उशीर झाला त्या बद्दल सर्वप्रथम क्षमस्व ; —
आताशा वैचारिक मंथन करणारे पुर्वीपेक्षा खुप कमी झाले आहे त्यात तुमची पकड विलक्षण आहे म्हणूनच तुमच्या शब्दांना सहजगत्या न सापडणारे सत्व आहे जो फार मोठा मंगल स्त्रोतराचा अखंडपणे वाहणारा सात्त्विक प्रवाह आहे ;
तुमचे या नवीन क्षेत्रातील पाऊल विविध भावभावनांचे विलोभनीय पौर्णिमेचे चांदणे ठरेल जे कायम स्वरूपी सुखनैव समाधानाचे जोगवा देणारे ठरेल याचा मला केवळ विश्र्वास नाही तर खात्री आहे ;
हार्दिक अभिनंदन नी पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा —-!
सुभाष तोंडोळकर औरंगाबाद ४/१०/२०