ग्रंथालयाकडे आम्ही ज्ञानमंदिर म्हणून पाहतो त्यामुळे ग्रंथपालाची भूमिका ज्ञानदात्या गुरुची ठरते, त्यादृष्टीने ग्रंथपालाची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे. ग्रंथपालांनी वाचनाची गोडी आणि वाचकांची संख्या वाढवावी. असे प्रतिपादन डॉ. छाया महाजन यांनी केले. कै.के.द. वडजीकर उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या वरद गणेश वाचनालयाच्या ग्रंथपाल हेमांगिनी गोपाळराव कट्टी यांना हा पुरस्कार डॉ. छाया महाजन आणि सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
“संयम हा ग्रंथपालाचा मोठा आवश्यक गुण आहे, ग्रंथालये लोकाभिमुख, अत्याधुनिक व्हावीत; यांसंबंधी येणाऱ्या आव्हानांना ग्रंथपालांनी सेनापती बनून सामोरे जावे.” असे विचार पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्ष सुनिल हुसे यांनी केले.
प्रतिवर्षी कै.प्रभाकर भालेराव स्मृतिदिनी दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे आयोजन, दोन तपांपासून असलेले सातत्य, वैशिष्ट्ये आणि महत्त्व जीवन विकास ग्रंथालयाचे कार्यवाह डॉ. राजशेखर बालेकर यांनी विशद केले. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत भास्करराव आर्वीकर, प्राचार्य जीवन देसाई आणि अशोक लाटे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथपाल पुरस्कार गौरवपत्राचे वाचन नितीन कंधारकर यांनी केले. पुरस्कारप्राप्त ग्रंथपाल हेमांगिनी कट्टी यांनी सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करत वरद गणेश वाचनालयाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
जीवन विकास ग्रथंथालय सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विनोद सिनकर यांनी केले,तर नृसिंह कुलकर्णी यांनी आभार मानले.
सदर समारंभास कट्टी परिवार, कुंडलिक अतकरे, मनोज वडजीकर, गुलाबराव मगर, नितीन काजवे, प्रकर्ष पिंगे यांसह अनेक ग्रंथपाल, ग्रंथप्रेमी नागरिक उपस्थित होते.